एकीकडे दुष्काळ आणि पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, फळभाज्या, धान्य, कापूस, तांदूळ यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे डिसेंबरमध्ये महागाईचा भडका उडू शकतो, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे.
2024 मध्ये महागाईचा दर 5.40 टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी आरबीआयची पतधोरण आढावा बैठक झाली. त्यानंतर दास यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.गेल्या काही काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याची कबुलीही दास यांनी दिली. 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत महागाईचा दर 5.6 टक्के, तर चौथ्या तिमाहीत 5.20 टक्के राहू शकतो. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पतधोरण आढावा बैठकीनंतर आरबीआयने हे आकडे सांगितले होते.
पुढच्या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर 5.40 टक्के इतका राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला होता. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम महागाईच्या दरावर झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही चढेच आहेत. पुरवठा साखळीसारखी अन्नधान्य महागाई वाढण्यामागे अनेक कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.