विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी एस. टी. गाड्या रवाना झाल्याने प्रवाशांची आज तारांबळ उडाली. गाड्या वेळेत स्थानकावर उपलब्ध न झाल्याने त्यांच्यात संतापाची लाट पसरली.गाड्या कमी व प्रवासी जादा यामुळे गाड्यांमधील सीटवर बसण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून जिल्हा प्रशासनाने सुमारे ४५१ गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार विभागाकडून निवडणूक कामकाजासाठी गाड्या पाठविण्यात आल्या.
यात चंदगड-गडहिंग्लज-आजरा आगारांतील ४६, राधानगरी-भुदरगड-आजरा ६५, कागल ५९, कोल्हापूर दक्षिण ३९, करवीर ५६, शाहूवाडी-पन्हाळा ५२, हातकणंगले ६१, इचलकरंजी २८, तसेच शिरोळ आगाराच्या ४५ गाड्यांचा समावेश आहे. त्या दोन दिवस निवडणुकीच्या कामासाठी रवाना झाल्याने मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी राहिली.
गाड्यांच्या प्रतीक्षेत ते तासन तास उभे होते. दुपारपर्यंत हीच स्थिती होती. दुपारनंतर विभागीय प्रशासनाने गाड्या उपलब्ध केल्याने गाड्यांमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. लहान मुलांना गाडीच्या खिडकीतून सीटवर प्रवासी ढकलत होते.