विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हददीतील सराईत गुन्हेगार रोहित शहाजी सातपुते (वय वर्ष २६ रा.विलासनगर,माळवाडी, शिरोली पुलाची ता.हातकणंगले) याला कोल्हापूर जिल्हयाच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.याप्रकरणी मंगळवार (दि. १९) आदेश काढण्यात आला.
रोहित सातपुते याच्याविरुद्धात गर्दी, मारामारी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दरोडा, नुकसान करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेच्या हददीमध्ये सातपुते याने दगड-काठ्यांनी गाडीच्या काचा फोडून नुकसान करुन एकास जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगाराविरुध्द सन २०२२ ते २०२४ मध्ये मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग व पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांनी त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्हयाचा व सद्यस्थितीचा विचार करुन सातपुते याला कोल्हापूर जिल्हाच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला.