लोकसभा निवडणुकीत सुळकूड पाणी योजना ठरणार…..

इचलकरंजी शहरात गेली आठ वर्षे पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. कुंभोज, दानोळी, कोथळी, सुळकूडनंतर आता शिरटीपर्यंतच्या उपसा ठिकाणापर्यंत या पाण्याने प्रवास केला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने या योजनांना ‘खो’ घालण्याचे काम लोकप्रतिनिधींनीच केले आहे. त्यामुळेच आजअखेर ही योजना होऊ शकली नाही. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत सुळकूड पाणी योजना कळीचा मुद्दा ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर समाधान न झालेल्या कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन हाच मुद्दा लोकसभेच्या प्रचारात असण्याचे स्पष्ट संकेत दिले. हा मुद्दा निवडणुकीत चर्चेत राहिला तर लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये पाणी हाच विषय महत्वाचा असल्याचे अधोरेखित होते.

सुळकूडच्या प्रश्नावर कृती समितीने आवाज उठवल्यानंतर विद्यमान आमदार आणि खासदारांनी जोरदार हालचाली केल्या. विद्यमान आमदारांचे मत आपणच पाणी आणणार, असे आहे तर खासदारांनी बैठक बोलावून आपण यामध्ये सक्रिय असल्याचे दाखवले आहे. एखादी योजना आठ वर्षे मागणी करूनही होत नसेल तर याला जबाबदार लोकप्रतिनिधींनाच धरावे लागेल. कोठूनही पाणी द्या, अशी अपेक्षा जनतेची आहे. मात्र, ते देण्यास लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही.