आटपाडी येथे भरणारा शनिवारी आठवडी भाजीपाला बाजार व शेळ्या-मेंढ्यांचा बाजार शुक्रवारीच भरणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे व बाजार समितीचे सचिव शशीकांत जाधव यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबररोजी होत असल्याने निवडणूक आयोगाने तालुक्यातील व महत्त्वाच्या गावातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत.
त्याच अनुषंगाने आटपाडी शहरात जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, शेळ्या-मेंढ्या खरेदी व विक्री करण्याचा बाजार हा शनिवारऐवजी आता शुक्रवारी भरवण्यात येणार आहे. याबाबत शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी शुक्रवारीच खरेदी व विक्री व्यवहार करावेत, असे आवाहन केले आहे. निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.