विजेच्या धक्क्याने सांगलीतील कडेगावात तरुणीचा मृत्यू!

आपल्या आसपासच्या परिसरामध्ये सतत काही ना काही घटना या घडतच असतात. काही ठिकानी एक्सीडेंट, आत्महत्या, मारामारी यांसारख्या घटनामध्ये खूपच वाढ झालेली आहे. अशीच एक घटना सांगलीतील कडेगाव मध्ये घडली आहे. विजेच्या धक्क्याने 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. सलोनी सलीम इनामदार असे तिचे नाव आहे. माळवाडी-कडेगाव येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विजेचा प्रवाह घरावरील पत्रा आणि कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेत पसरला होता.

त्याला सलोनीचा स्पर्श झाला. महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे तरुणीचा बळी गेला. त्यामुळे महावितरण कार्यालय, तसेच संबंधित कर्मचारी, अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली.मोलमजुरी करणार्‍या गरीब कुटुंबातील सलोनी येथील महाविद्यालयात शिकत होती. शुक्रवारी तिचे आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले होते. ती घरातील दैनंदिन कामे करीत होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ती कपडे धूत होती. तिच्या घराजवळील विजेच्या खांबावरील तारेतील वीजप्रवाह घरावरील पत्र्यामध्ये पसरला होता. तेथून तो कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेत पसरला होता. घराच्या पत्र्याला लागून लोखंडी अँगलला तार बांधलेली होती. या तारेवर कपडे वाळत घालण्यासाठी ही तरुणी गेली असता, तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घरातील महिला व शेजारच्या नागरिकांनी तिला वाचविण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले.