प्रवासी कुटुंबाचा नऊ लाखांचा ऐवज बसमधून लंपास

संभाजीनगर ते मिरज या बसमध्ये प्रवासी कुटुंबाचे तब्बल ९ लाखांचे दागिने चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला. याबाबत पवन अशोक बाबर (वय ३४, मूळ रा. सांगोले, ता. खानापूर) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन बाबर हे फोंडा (गोवा) येथे फार्मा कंपनीत नोकरीस आहेत. दि. १८ रोजी सायंकाळी ते संभाजीनगर ते मिरज बसमधून तासगावकडे येण्यास निघाले. बाबर हे पत्नी, मुलीसह प्रवास करत होते.

संभाजीनगर येथून सायंकाळी सातच्या सुमारास बस निघाली. बाबर यांच्याकडे मोठी प्रवासी बॅग होती. बॅग ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी पाठीमागील सीटच्या खाली ठेवली होती. बॅगेत एक लाख २० हजार रूपयांचा दोन तोळ्यांचा नेकलेस, ९६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुमके, तीन लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या, ३ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र, ३० हजार रूपयांची सोन्याची साखळी, ३० हजार रूपयांची सोन्याची अंगठी असा ऐवज होता.

रात्री पावणे नऊ वाजता बस तासगाव बसस्थानकावर आली. तेव्हा त्यांनी सीटच्या खाली ठेवलेल्या बॅगेतील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. सर्वत्र शोध घेऊनही दागिने आढळले नाहीत. त्यामुळे बाबर यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.