काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने ७४ टक्के मतदान झाले. 2 लाख 80 हजार 856 मतदारांपैकी 2 लाख 60 हजार 833 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 12 उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. इस्लामपूर शहर व परिसरातील मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे यांनी लष्करी जवानांसह संचलन केले. मतदान केंद्राच्या बाहेर पाचहून अधिक जमाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिस्त लावत नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात शांततेने मतदान प्रक्रिया पार पडली.
संचलनामध्ये २७४ पोलिस, २०० होमगार्ड, १५ पोलिस अधिकारी, आयटीबीटी १ प्लाटून, सिमा सुरक्षा दलाच्या २४ जवानांचा समावेश होता. मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानापर्यंत शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन केले. इस्लामपूर शहरासह पेठ, नेर्ले, बहे, बोरगाव, मसुचीवाडी, कामेरी आदी मतदारसंघातील गावांमध्ये विविध मतदान केंद्रांवर मतदान शांततेने पार पडण्यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न केले.
मतदान केंद्राबाहेर स्लिपा वाटण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था केली जाते. याठिकाणी पाचहून अधिक असणाऱ्या कार्यकर्त्याना त्याठिकाणी न थांबण्याचे आदेश पोलिसांकडून वेळोवेळी देत असल्याने मतदान शांततेने पार पडले.