बलवडीत बुधवारी संत साहित्य संमेलन! भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन 

खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथे जोतिर्लिंग वाङ्मय साहित्य सेवा संस्थेच्यावतीने बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी ३२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनांतर्गत संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध साहित्यिक श्रीरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होत आहे.  बलवडी (भा.) येथे गेल्या ३१ वर्षांपासून साहित्यिकांचा मेळा भरत आहे. गेल्या तीन दशकापासून जोतिर्लिंग साहित्य सेवा संस्थेने हा उपक्रम सुरू ठेवला आहे. यावर्षी या संमेलनांतर्गत संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन कराड येथील कृष्णा वैद्यकीय रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुशील लाड यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख ह. भ. प. प्रा. धनंजय होनमाने स्वागताध्यक्ष आहेत. सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. कथाकार विजय जाधव यांचे कथाकथन तर मंगळवेढा येथील कवी लक्ष्मण हेम्बाडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.