राहुल आवाडे की मदन कारंडे? इचलकरंजीत कोण मारणार बाजी? विठ्ठल चोपडे किती मते घेणार?

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. सकाळच्या पहिल्याच सत्रात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे. एकूण ३ लाख १२ हजार ६६४ मतदारांची नोंद झाली होती. एकूण २६६ मतदान केंद्रांपैकी २४३ केंद्रे ही वेबकास्टिंग मतदान केंद्रे होती. तर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध १४ मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या संकल्पना (थीम) राबविण्यात आल्या होत्या.दुपारी ४ नंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्याने रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहिली.

मतदारसंघात सरासरी ६५ ते ६७ टक्के मतदान झाल्याचे समजते. महायुतीच्या वतीने राहुल आवाडे, महाविकास आघाडीच्या वतीने मदन कारंडे आणि अपक्ष विठ्ठल चोपडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यापैकी राहुल आवाडे आणि मदन कारंडे यांच्यातच अत्यंत मुख्य लढत आहे. अपक्ष विठ्ठल चोपडे हे किती मते घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी चंदूर येथे, आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी डीकेटीई नारायण मळा, अपक्ष उमेदवार चोपडे यांनी कै. सुभेदारकाका विद्या मंदिर, आमदार प्रकाश आवाडे यांनी नुतन मराठी विद्यालय आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सरस्वती हायस्कुल येथील केद्रांवर मतदान केले.

काही ठिकाणच्या केंद्रांवर एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर उमेदवार समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती. मतदारांच्या सोयीसाठी सर्वच उमेदवारांनी मतदान केंद्र परिसरात बुथ उभारणी करुन आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सहकार्य केले जात होते.