इचलकरंजीमध्ये तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे. एकूण ३ लाख १२ हजार ६६४ मतदारांची नोंद झाली होती. एकूण २६६ मतदान केंद्रांपैकी २४३ केंद्रे ही वेबकास्टिंग मतदान केंद्रे होती. तर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध १४ मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या संकल्पना (थीम) राबविण्यात आल्या होत्या.

सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. सकाळच्या पहिल्याच सत्रात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासातच तब्बल २३ हजार ३४२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन तासाच्या कालावधीत ही आकडेवारी ६१ हजार ८१२ म्हणजे १९.७७ टक्के होती. पहिल्या दोन्ही सत्रात महिलांची टक्केवारी लक्षणीय होती. दुपारी १ वाजेपर्यंत त्यामध्ये ४१ हजार मतदारांची भर पडून आकडेवारी १ लाख २ हजार ५२८ इतकी झाली. तीन वाजल्यानंतर शहरातील अनेक केंद्रांवर उपस्थित राजकीय कार्यकर्त्यांना मतदार आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत होती.

सर्वांचे रुसवे, फुगवे काढत आणि मागणी पूर्ण केल्यानंतरच मतदार वाहनातून गटागटाने मतदान केंद्रावर येताना दिसत होते. शहरातील दाट लोकवस्तचा परिसर असलेल्या बहुतांशी केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारच नसल्याचे चित्र होते. मात्र चारनंतर हीच मतदान केंद्रे नागरिकांच्या रांगा लागल्याने गर्दीने फुलून गेली होती. त्यामुळे प्रशासनाची तारांबळा उडाली. तर पोलिसांनाही कसरत करावी लागली.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात बुधवारी मध्यंतरीचा काळ वगळता अत्यंत चुरशीने मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वाद, तांत्रिक बिघाड वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.दुपारी ४ नंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्याने रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहिली. मतदारसंघात सरासरी ६५ ते ६७ टक्के मतदान झाल्याचे समजते.