खानापूर मतदारसंघात यंदा कोण मारणार बाजी? लेंगरे गटाची भूमिका ठरणार निर्णायक…… 

विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षात तुल्यबळ लढत होत आहे. आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्यामुळे ही लढत तिरंगी झाली. या मतदारसंघात लेंगरे गटातील गावांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे. ही गावे कोणत्या पारड्यात मते टाकतात, यावर खानापूर मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात महाआघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील हे उमेदवार आहेत.

 महायुतीकडून एकनाथ शिंदेसेनेचे उमेदवार सुहास बाबर हे आपले नशीब आजमावत आहेत. यातच आटपाडीची अस्मिता म्हणून माजी आमदार राजेंद्र देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. लेंगरे हा खानापूर तालुक्यातील संवेदनशील जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातो. लेंगरे गटातील सर्व गावे निवडणुकीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. येथे अनिल बाबर व सदाशिवराव पाटील हे दोन्ही गट मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. दोन्ही गटांनी प्रचाराचे रणधुमाळी मोठ्या प्रमाणात उठवली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर मतदार संघात यंदा कोण बाजी मारणार हे लेंगरे गटातून कोण मताधिक्य घेणार यावर अवलंबून राहणार आहे