हातकणंगले तालुक्यामधील शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शिरोली येथील माजी लोकप्रतिनिधी व नामांकित व्यावसायिक यांच्या नावाने व त्यांचे बंधू तसेच दोघा भावांच्या मुलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ती स्मशानभूमीत ठेवण्यात आली.
या चिठ्ठीवर शिरेचा लिंबू, बिबा, सुई, टाचणी, हळद कुंकू, बाहुली ठेवण्यात आलेली आहे.
तसेच दिवसाला ज्याप्रमाणे नैवेद्य ठेवतात त्याप्रमाणे नैवेद्य ठेवण्यात आलेला होता. ही घटना शिरोली येथील एक व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या ठिकाणी दहन करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकारामुळे शिरोली पुलाची परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरलेले आहे. उपस्थित लोकांनी त्या चिठ्ठीवर पाणी ओतले. ही गोष्ट संबंधित लोकप्रतिनिधींना समजल्यावर त्या ठिकाणी गेले त्यांनी स्वतः त्या सर्व प्रकारचे फोटो काढले. आणि या भानामतीच्या प्रकारास तसेच या अंधश्रद्धेला आपण व आपले कुटुंबीय बळी पडणार नसल्याचे सांगितले. तसेच इतर लोकांनी सुद्धा याला बळी पडू नये असे सांगितले.