पुलाची शिरोलीतील घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्पासाठी निधी द्यावा

कार्तिकेयन एस. यांनी पुलाची शिरोली गावातील पंचगंगा नदी शेजारील कचरा डेपो, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, दर्ग्या शेजारील सांडपाणी बंधारा, ग्रामपंचायत कामकाज, दप्तर तपासणी केली. घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने जागेची मागणी केली आहे. घन कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या दोन अत्यावश्यक कामांसाठी जिल्हा परिषदेने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपसरपंच बाजीराव पाटील व माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचेकडे केली. 

स्व. आर. आर. पाटील स्मार्ट गाव स्पर्धेनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हि मागणी करण्यात आली. बैठकीस सरपंच पद्मजा करपे, उपमुख्यकार्यकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी आदी प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यामध्ये पुलाची शिरोली, निगवे दुमाला, पिंपळगाव, सांबरे, दिघवडे, औरवाड, फणसवाडी आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. याबाबत कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून जागा उपलब्ध करून देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.