विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणार्या सहलींना आता शिक्षण विभागाने मुदत घातली आहे. दि. 15 जानेवारीपर्यंत शाळांना सहलींचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर सहलींचे आयोजन करू नये, असे पत्र माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगातील माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये पर्यटनाची आवड निर्माण व्हावी, नवीन काही तरी माहिती मिळावी या उद्देशाने प्रत्येक शाळांच्या वतीने सहलींचे आयोजन केले जाते.
शाळांना सहली काढावयाच्या झाल्यास त्यांना माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी पूर्वी कधीही मागितली जायची; परंतु त्यालाही आता कालावधी निश्चित करण्यात आला आहे. शाळांच्या सहली काढावयाच्या असतील त्यासाठी लवकर परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
त्यानंतर सहलीच्या परवानगीसाठी आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे दि. 15 जानेवारीपर्यंतच शाळांनी सहलींचे नियोजन करावे, दि. 15 जानेवारनंतर शाळांनी सहली काढू नयेत, असे माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.
सहलीच्या परवानगीसाठी हे आवश्यक
मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र व विद्यार्थ्यांची यादी, सहलीच्या ठिकाणाची, अंतराची व कालावधीची माहिती, विद्यार्थ्यांच्या विम्याची प्रत, बसबाबतची माहिती व आवश्यक ती कागदपत्रे, प्रथमोपचार किटची माहिती