दिग्गज राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाला सुरुंग

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. विशेषतः विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का देणारा राहिला आहे.विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात देखील आहे.

जिल्ह्यातील मातबर नेत्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून त्या-त्या मतदार संघावर वर्चस्व राहिलेल्या घराण्यांची सत्ता या निवडणुकीत संपुष्टात आली आहे. अगदी नवख्या उमेदवारांनी या घराण्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सांगोल्याच्या साळुंखे-पाटील परिवाराचीही वेगळी ओळख आहे. दीपक साळुंखे-पाटील स्वतः आमदार तसेच दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत.

दीपकआबांचे वडील काकासाहेब साळुंखे-पाटील हे शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांचा सांगोल्यातून पराभव करून विधानसभेत पोचले होते. तर दीपकआबांच्या भगिनी जयमाला गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ तसेच इतर विविध सहकारी संस्थांवर साळुंखे-पाटील परिवारातील सदस्यांनी काम केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील व शहाजी पाटील यांचा पराभव केला.