अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील खड्डे, स्पीड ब्रेकर तसेच भरधाव गाड्या चालवल्यामुळे अपघातात वाढ झालेली आहे. अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. असाच एक अपघात हुपरी येथे घडला आहे. भरधाव आलेल्या एस.टी. बसने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या सौ. स्मिता चंद्रकांत पाटील (वय 32, रा. इंगळी) या शिक्षिका जागीच ठार झाल्या. हा अपघात हुपरी येथील श्री अंबाबाई मंदिर पूर्व कमानीसमोर मुख्य रस्त्यावर बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला.या अपघाताबरोबरच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत अन्य तिघे जखमी झाले आहेत.
सांगवडेच्या वरद गुरुकुल निवासी शाळेत संचालिका व शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. स्मिता पाटील या हुपरी येथे कामानिमित्त आल्या होत्या. मोटारसायकल त्यांच्या शाळेचा शिपाई वैभव जाधव (रा. सांगवडे) हा चालवत होता. परत जात असताना हुपरी माळभागावरून भरधाव आलेल्या एस.टी. बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये सौ. पाटील यांचे डोके रस्त्यावर जोरदारपणे आदळल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातात वैभव जाधव हाही जखमी असून, त्याला कोल्हापूरला उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. चालक विनायक दिनकर चौगुले (रा. चिमगाव, ता. कागल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे इंगळी-सांगवडे भागात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी फेब-ुवारीमध्ये याच ठिकाणी उसाने भरलेला ट्रॅक्टर थेट एका दुकानात घुसला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली होती. आज त्याच ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे त्याची चर्चा होती.