पूर्ववैमनस्यातून अंबप येथे तरूणाचा धारदार शस्त्रांनी खून

अंबप (ता. हातकणंगले) येथे १९ वर्षीय तरुणाचा अज्ञात तीन तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूर्ववैमनस्यातून खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, अंबप ते अंब फाटा रस्त्यावर बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे. येथे शेजारीच पाण्याची टाकी आहे. येथे नेहमी ग्रामस्थ बसतात. दरम्यान, यश दाभाडे सायंकाळी अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेला होता. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास मोटारसायकलवरून तीन तरुण अचानक आले.

त्यांनी बेसावध असलेल्या यशवर कोयत्याने सपासप वार करून महामार्गाच्या दिशेने ते पळून गेले. या हल्ल्यात यशच्या डोक्यात वर्मी घाव बसला, तसेच अतिरक्त रक्त व झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात आठ वार केले होते तर डावा हात मनगटातून तुटला होता. दरम्यान, महिलांच्या निदर्शनास रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह निदर्शनास आला. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. दरम्यान, पेठवडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक, संजय माने, उपनिरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.