ऐतिहासिक रंकाळा तलावात लवकरच अत्याधुनिक लाईट इफेक्टसह म्युझिक फांऊटन (संगीत कारंजा) होणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.येत्या काही महिन्यात म्युझिक कारंजाचे काम पूर्ण होईल. परिणामी कोल्हापुरकरांचे रंकाळ्यात म्युझिक कारंजाचे स्वप्न साकारणार आहे. त्यामुळे कोल्हापुरचा मरीन ड्राईव्ह असलेला रंकाळा अधिकच नयनरम्य होवून वैभवात भर पडणार आहे.
रंकाळा टॉवरपासुन सुमारे वीस मीटर आत कारंजा असेल. रंकाळा परिसरातून ये-जा करणार्या वाहनधारकांना मात्र कारंजा दिसणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. कारंजाची लांबी 24 मीटर असेल. तसेच सुमारे 15 मीटर उंचीपर्यंत कारंजातील पाणी उडेल. रंगीबेरंगी लाईट इफेक्ट असतील. कारंजातून कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. तसेच श्री अंबाबाई देवी, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय तिरंगा, शाहू महाराज यांच्यासह महामानवांच्या प्रतिमा लाईट इफेक्टच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. प्रत्येकी सुमारे 15 मिनिटांचे शो आयोजित केले जाणार आहेत.