इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच विरोधक एकवटल्याने निवडणूक चुरशीची झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले होते. आमदार जयंतराव पाटील यांचे अनेक परंपरागत विरोधक निशिकांत भोसले पाटील यांना जाऊन मिळाले. त्यामुळे निशिकांत भोसले-पाटील यांची मतदारसंघात ताकद वाढली. आणि यावेळी परिवर्तन होणार असा सूर मतदारसंघात उमटू लागला. निशिकांत भोसले पाटील यांच्या समर्थकांनीही मतदारसंघात
मोठी यंत्रणा उभी केली.
देशात आणि राज्यात असणाऱ्या सत्तेचा फायदा निशिकांत भोसले पाटील यांना होऊ लागला. मतदारसंघाचे वारे फिरले असताना स्वर्गीय विलासराव शिंदे गट काय भूमिका घेणार ? याकडे मतदार संघाचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, झुंझारराव शिंदे, धैर्यशील शिंदे, तानाजी सूर्यवंशी, शैलेश सावंत, बाबासो सिद्ध यांच्या सोबतीने आष्टा शहरात शिंदे गटाचा मेळावा आयोजित केला.
या मेळाव्यात आष्टा शहरातील कार्यकर्त्यांसह बागणी, कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, काकाचीवाडी, भडकंबे, रोझावाडी, शिगाव बावची, कोरेगाव, ढवळी, गोटखिंडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहिले. या मेळाव्यात वैभव शिंदे यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आदेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला. झुंझारराव पाटील, विशाल शिंदे यांनी मेळाव्यात आक्रमक भूमिका घेत आमदार जयंतराव पाटील यांचे हात बळकट करण्याची भूमिका मांडली. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते चार्ज झाले. वैभव शिंदे यांनी तर वेगळी भूमिका घेणाऊयांना माझे दरवाजे सदैव बंद असतील, असा इशारा दिला.
या मेळाव्यामुळे आष्टा मतदारसंघातील विविध गावातील स्वर्गीय विलासराव शिंदे गटाचे कार्यकर्ते मान- अपमान विसरुन आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रचारात मग्न झाले. वैभव शिंदे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे त्यांनी मतदारसंघातील बागणी, कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, काकाचीवाडी, रोझावाडी, शिगाव, बावची, कोरेगाव, गोटखिंडी, ढवळी, भडकंबे येथील कार्यकर्त्यांच्या विविध बैठका लावल्या. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आमदार जयंतराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याच्या सूचना केल्या. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात जीव ओतून काम केले.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्यामुळे आमदार जयंतराव पाटील यांना विविध शहरासह गावांमध्ये मताधिक्य घेण्यात यश आले.
कोरेगाव, बागणी, रोझावाडी, भडकंबे, बावची, शिगाव, मर्दवाडी आदी गावामध्ये जयंतराव पाटील गटासोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहिल्याने जयंतराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले. वैभव शिंदे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे यांनी लावलेली यंत्रणा यशस्वी झाली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे जयंतराव पाटील यांना आठव्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. विजयात शिंदे गटाचा सिंहाचा वाटा ठरला. हे नाकारता येणार नाही. अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या शिंदे गटांच्या नेत्यांना आमदार जयंतराव पाटील भविष्यात बळ देणार का ? याची उत्सुकता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार जयंतराव पाटील यांचा निसटता विजय झाला. या विजयात मतदार संघातील विविध गावातील स्व. विलासराव शिंदे गटाची भूमिका आमदार जयंतराव पाटील यांच्यासाठी फायदेशीर ठरली. जयंतराव पाटील यांच्या विजयात स्व. विलासराव शिंदे गटाचा मोलाचा वाटा ठरला. वैभव शिंदे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे यांनी आष्टा शहरासह तालुक्यातील आणि गावात जयंतरावांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी ठरल्यानेच जयंतरावांचा विजय सुकर झाला. शिंदे गटाने वेगळी भूमिका घेतली असती तर मतदारसंघाचा निकाल वेगळा लागला असता, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे.