पंचगंगा स्थिर पाण्याला हिरवट रंग, महापालिकेकडून तूर्त उपसा बंद; अंशतः पाणीपुरवठा विस्कळीत

इचलकरंजी शहराला कृष्णा नदीबरोबरच पंचगंगा नदीतूनही पाणीपुरवठा केला जातो; मात्र काही दिवसांपासून नदीतील पाण्याची पातळी खालावली असून सध्या पाणी स्थिर आहे. त्यामुळे शेवाळाचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे. पाणी प्रवाही नसल्यामुळे या पाण्याला उग्र वास येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पंचगंगा नदीपात्रात सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असते. काही ठिकाणी उद्योगातून बाहेर पडणारे पाणीही थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीतील पाणी प्रवाहित न झाल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

परिणामी, नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे गेल्या वर्षीही परिस्थिती उद्‍भवली होती. सध्या पाण्याची पातळी कमी झाली असली तरी घाट परिसरात कपडे, वाहने धुण्यासाठी वर्दळ सुरूच आहे. धार्मिक विधी होत आहेत. यापूर्वी महापालिकेने पंचगंगा नदीमध्ये अशा गोष्टींना पायबंद घातला होता; पण सध्या याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत कोणतेही प्रबोधन करण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे प्रदूषणात भरच पडत आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी शहरात आलेल्या काविळीच्या साथीमध्ये ४२ हून अधिक नागरिक दगावले होते, तर सध्या पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणामुळे काठावरील गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाण्यामुळे होणाऱ्या विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नदीतील प्रदूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. जलशुद्धीकरणासाठी क्लोरिन व तुरटीचा डोस वाढविला होता. आता नदी प्रवाही होईपर्यंत पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून पंचगंगा योजनेतून पाणी उपसा बंद केला आहे. आता पंचगंगा नदी प्रवाही होईपर्यंत पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील अंशतः पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.