सर्वसामान्यांना दिलासा ! दिवाळीत महाग झालेला किराणा झाला स्वस्त..

ऐन सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलासह इतर वस्तूचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले होते. मात्र आता दिवाळीत महाग झालेला किराणा काहीसा स्वस्त झाला आहे.दिवाळीत तेजीत असलेली बाजारपेठ निवडणुकीच्या काळात कमालीची मंदावली होती. त्यामुळे किराणा बाजारातदेखील मोठी उलाढाल न झाल्याने अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहे. यात तेल, साखर, डाळ, साबुदाणा, शेंगदाणा दरात घसरण झाली असून भाव काहीसे स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना थोडा यामुळे दिलासा मिळाला आहे.

सणासुदीत खाद्यतेलाच्या पाठोपाठ इतर किराणा मालाचे दर चांगलेच वधारले होते. गणेशोत्सव काळात चणाडाळ, तेल, साखर, गुळाचे दर वाढले होते. त्यानंतर पितृपंधरवड्यात शांत राहिलेल्या बाजारात नवरात्रपासून पुन्हा तेजी आली. दसरा व नंतर दिवाळीत खाद्यतेलासह किराणा दर कमालीचे वाढले होते. मात्र आता किराणा मालाच्या विविध वस्तूच्या किमतीत २ ते १० रुपयांची घसरण झालेली दिसून येत आहे.