इचलकरंजी – सांगली रस्त्यावरील महालक्ष्मीनगरमधील गोसावी अपार्टमेंट येथे असलेला फ्लॅट आणि एका कार्यालयाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी 7 लाख 25 हजारांची रोकड व चांदीचे दागिने असा 7 लाख 73 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला.याप्रकरणी संजय संपत चारी (50, रा. राधाकृष्ण कॉलनी) यांनी गावभाग पोलिसांत फिर्याद दिली. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गोसावी अपार्टमेंटमध्ये संजय चारी कुटुंबीयांसह राहतात. दोन दिवस त्यांचा फ्लॅट बंद होता. चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणार्या दोन तिजोर्यांचे कुलूप तोडून तेथील चांदीच्या चार समई, चांदीच्या चार वाट्या, 4 ग्लास आणि रोख 5.50 लाख रुपये असा 5.90 लाखांचा ऐवज लांबवला. तसेच या फ्लॅट लगतच असलेल्या प्रेमसिंग वगतावरसिंग सोलंकी (54) यांचे कार्यालयही फोडले.
कार्यालयातील कपाटात ठेवलेले 8 हजाराचे चांदीचे 8 कॉईन व 1 लाख 75 हजारांची रोकड असा 1 लाख 83 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दोन्ही घटनांमध्ये एकूण 7 लाख 73 हजार 500 रुपयांची चोरी झाल्याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासठी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र तेही काही अंतरावरच घुटमळले. पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी भेट दिली व तपासाबाबत सूचना केल्या.