शेती तोट्यात त्यात शेतीपूरक व्यवसाय कसा करावा आणि कोणता करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आम्ही तुम्हाला असे शेतीपूरक व्यवसाय सांगणार आहोत ते तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. शेतीपूरक व्यवसाय हे तुमच्या शेतीवर आणि पशुधनावर आधारित असल्याने गुंतवणूक कमी असते. अनेक व्यवसायांसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध करून दिलं जातं. सुरुवातील लहान स्तरावर शेतीपूरक व्यवसाय सुरू करून तुम्ही कालांतराने त्याचा विस्तार वाढवू शकता.
दुग्ध व्यवसाय- दुग्ध व्यवसाय हा भारतातील परंपरागत शेती पूरक व्यवसाय आहे. गोपालन किंवा म्हैस पालन करून हा व्यवसाय करू शकतो. यासाठी तुमच्या शेतातील पीकाचा चारा किंवा ज्वारी बाजरीचा कडबा पशुखाद्य म्हणून वापरल्यास खर्च कमी होईल. शिवाय जनावरांच्या मलमूत्राचा शेतात खत म्हणून वापर करू शकता. सुरुवातीला कमी जनावरं ठेवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि कालांतराने व्यवसाय वाढवू शकता. कारण भारतात दूधाची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
शेळीपालन- शेळीपालनातूनही शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो. अखेर शेळी ही गरीबांती गाय म्हणून ओळखली जाते. मात्र ती शेतकऱ्याला श्रीमंत देखील करू शकते. शेळी ही कोणत्याही वनस्पतीवर जगते. मग तो कोणताही पालापाचोळा असो त्यामुळे पशुखाद्यावर जास्त खर्च होत नाही. पुरेशी जागा उपलब्ध असेल तर हा व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल. शेळीच्या आणि मेंढीच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याला भावही चांगला मिळतो. खास करून हॉटेल व्यवसाय विस्तारल्याने मागणी वाढली आहे. शेळीपालन हा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे.
भाजीपाला शेती- धान्यांसोबत रोजच्या जिवनातील महत्वाचा घटक म्हणजे भाजीपाला. रोजच्या जेवणासाठी घराघरात भाजीपाला गरजेचा असतो. म्हणजेच मोठी मागणी असणाऱ्या भाजीपाला लागवडीमुळे अधिकच उत्पन मिळू शकतं. योग्य नियोजन करून भाजीपाला लागवड केल्यास शेतकऱ्याला चांगला नफा मिळवणं शक्य आहे. अलिकडे सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्ही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याचं योग्य मार्केटिंग केल्यास फायदा होईल.
औषधी वनस्पतींची लागवड- अलिकडे अनेकजण आयुर्वेदिक औषोधोपचाराकडे वळू लागले आहेत. आयुर्वेदिक उपचारांचे साईड इफेक्ट नसल्याने त्याचं महत्व वाढू लागले आहेत. त्यात मोठ मोठ्या आजारांवरही आयुर्वेदामुळे निदान शक्य आहे हे आता लोकांना पटू लागलंय. परिणामी औषधी आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मागणी वाढू लागली आहे. काही औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शासनाकडूनही मदत केली जाते. यात रोपं, बियाणं पुरवणं, लागवडीविषयी माहिती देणं,बाजारपेठ देणं अशी मदत मिळते.
गांडुळ खत उत्पादन- वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक आणि वाढीसाठी आवश्यक असणारे हार्मोन्स गांडुळ खतातून मिळतात. फळं, फूलं आणि भाजीपाला शेतीला गांडुळखत फायद्याचं आहे. त्यामुळे गांडुळ खताला मोठी मागणी आहे. गांडुळ खताच्या विक्रितून चांगल उत्पन्न मिळतं त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी पाहणं गरजे आहे.