सन २३-२४ गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला २०० रुपये अंतिम हप्ता मिळावा. २०२४-२५ हंगामातील उसाला प्रतिटन ३७०० रुपये पहिली उचल मिळावी आदी मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये अंतिम हप्ता व सुरू हंगामासाठी पहिली उचल म्हणून प्रतिटन ३७०० रुपयांची मागणी होती. कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे.
मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या १५ दिवसात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा. गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसात कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा. पुरामध्ये बाधित झालेल्या उसाची प्राधान्याने तोड करावी. ऊस तोडणी मजुरांची मजुरी वाढूनही व तोडणी वाहतूक एफ. आर. पी.मधून कपात करूनही तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी ५ ते १० रुपयांची मागणी केली जात आहे. अशा पध्दतीने लूट करणारे संबंधित तोडणी वाहतूकदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा साखर कारखान्यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. अॅड. एस.यू. संदे, सचिन यादव, जगन्नाथ पाटील, शामराव जाधव, अशोक सलगर आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.