इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक कोण जिंकणार? इचलकरंजीच्या नव्या आमदाराची कसोटी….

कोल्हापूर जिल्ह्यात दोन महापालिकांच्या निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेची यंदा पहिल्यांदा निवडणूक होणार आहे. एप्रिल ते मे महिन्यात या निवडणुकीचा धुव्वा उडणार आहे. अशातच इचलकरंजीच्या नव्या आमदाराची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग येणार आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

महाविकास आघाडी येणारी महापालिका एकत्र लढवणार असून महायुतीमध्ये सध्या तरी बेबनाव आहे. त्यामुळे इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. इच्छुकांनी सर्वोतोपरी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी महापौर पदावर दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.

शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून खचलेल्या कार्यकर्त्यांना उमेद देण्याची भावना या बैठकी मागे होती. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही स्वबळावर लढू अशीच भूमिका दोन्ही गटांची सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांची कसोटी लागणार आहे.