नेतेमंडळींचा पक्षबदल पण कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था….

सध्या सगळीकडेच राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडीनंतर आता आगामी निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षातील नेते हे आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करतानाचे चित्र सर्वांनाच दिसले. इचलकरंजी शहरात देखील ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालीच. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काही माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी राजकीय नेत्यांशी आपली सलगी वाढवलेली आहे.

शहरातील काही पक्षातील नेते आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन आपले स्थान निश्चित करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा प्रकार सुरूच आहे आणि या प्रकारामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते हे बुचकळ्यात पडलेल्याचे चित्र दिसत आहे.

आयात नेत्यांच्या आगमनामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न देखील कार्यकर्त्यांना सतावत आहे. नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षबदल भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमधून नेत्यांबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. नेतेमंडळींनी निवडणुकीमध्ये आपला उपयोग करून आपल्या सोयीचे राजकारण करत आहेत. तेव्हा नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राजकारण करावे अशी अपेक्षा देखील कार्यकर्त्यांमधून सूर धरू लागला आहे.