चिकुर्डे येथे ग्रामस्थांनी रोखली ऊस वाहतूक


चिकुर्डे (ता. वाळवा) येथे चिकुर्डे ते मांगले रस्त्याने होणाऱ्या उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींची वाहतूक ग्रामस्थांकडून थांबवण्यात आली.  चिकुर्डे येथे ३ रोजी पहाटे चिकुर्डे मांगले रस्त्यावरती भरलेल्या उसाच्या ट्रॉलीचा हुक निघाला. त्यामुळे ट्रॉली पाठीमागे जाऊन रस्त्या शेजारी असणाऱ्या घरावरती पलटली. यामध्ये घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले. जीवितहानी टळली आहे. येथील मारुती पराजवळ चढतीचा रस्ता असल्यामुळे येथे अवजड वाहतूक करणे वाहनास कठीण जाते. या ठिकाणावरून होणारी अवजड वाहतूक एकेरी स्वरूपाने करण्यात यावी.

याकरिता ग्रामपंचायतीने वेळोवेळी साखर कारखाना प्रशासनाला निवेदने दिलेली आहे. तरीही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच संतापलेल्या ग्रामस्थांनी या रस्त्यावरून होणारी उसाची अवजड वाहतूक थांबवून ठेवली. 
यावेळी सरपंच रणजीत पाटील यांनी कारखाना अधिकाऱ्यांना बोलावून दिलेल्या निवेदनाप्रमाणे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे या ठिकाणावरून वाहतूक करावी लागेल. नियमांचा भंग केल्यास ग्रामपंचायतीकडून कडक कारवाई केली जाण्याचा इशारा सरपंच रणजीत पाटील यांनी दिला आहे.