सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आणि दिवसाढवळ्या राजरोसपणे चालणारे ऑनलाइन गेम्सचे विनापरवाना आधुनिक जुगार अड्डे पोलिसांच्या रडारवर आले असून पोलिस प्रशासनाने खानापूरसह आटपाडी व तासगाव तालुक्यातही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या प्रकाराने विनापरवाना ऑनलाइन गेम्स चालविणारे चालक व मालक कारवाईच्या भीतीने चांगलेच धास्तावले आहेत.
खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव यासह जिल्ह्यातील अनेक तालुके व ग्रामीण भागातही प्रशासकीय यंत्रणेला आव्हान देत राजरोसपणे जुगार अड्डे सुरू होते. यात शाळकरी मुलांसह वृद्ध, तरुणही गुरफटत निघाले आहेत. लुटीचा बाजार या सदराखाली ऑनलाइन जुगार अड्डयांच्या कारभारावर प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे ऑनलाइन जुगारचालक मालकांत मोठी खळबळ उडाली होती. या मालिकेमुळे पोलिस प्रशासनही खडबडून जागे झाले. सध्या खानापूर, आटपाडी, कडेगाव, तासगाव या तालुक्यात किती ऑनलाइन गेमची
ठिकाणे आहेत, त्याची नोंदणी आहे का, शासनाला कर दिला जातो का, याची माहिती संकलित करण्याचे काम पोलिस प्रशासनाने हाती घेतले आहे. सर्व तालुक्यांत सुरू असलेल्या ऑनलाइन गेमच्या केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली असून दोषी आढळल्यास कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.