अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते त्यामुळे सतत नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मागणी होत असते. अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाळवा तालुक्यात देखील शेतकऱ्यांची वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्याची मागणी होती. रेठरे धरण परिसरातील विहिरी तसेच ओढ्यांना पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे वाघवाडी शिवपुरी धुमाळवाडी, मरळनाथपूर रेठरे धरण याठिकाणी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे.
या परिसरातील तलावात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत वाकुर्डे बुद्रूक योजनेचे पाण्याचे आवर्तन सुरू करण्याबाबत बैठक झाली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. २ फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्यात आले.
प्रथम शिवपुरी येथील तलाव, कामेरी येथील गोचर तलाव, वाघवाडी बंधारा, भरून घेण्यात आला आहे, तसेच शिवपुरी येथील शेतीसाठी देखील पाणी सोडण्यात आले आहे. धुमाळवाडी येथील तलाव, रेठरे धरण तलावात पाणी सोडून, सिंचनासाठी वितरिका खुल्या करण्यात आल्या आहेत. मरळनाथपूर सिंचन क्षेत्रासाठी तसेच ओढ्यातील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले आहे. रेठरे धरण येथे आवर्तन सुरू केल्यावर सुरुल ओझर्डे याठिकाणी देखील पाणी सोडण्यात आले असून या पाण्याचा शेतकऱ्यांच्या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे शिवपुरी, कामेरी, वाघवाडी, धुमाळवाडी, तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असून, मरळनाथपूर, रेठरे धरण, सुरूल, ओझर्डे, तसेच इटकरे फाटा याठिकाणी तलावात तसेच शेतीला पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे.