उसन्या पैशाच्या कारणावरून घराबाहेर बोलावून मारहाण

उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून चिडून दोघांनी मिळून एकास घराबाहेर बोलवून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता सरगरवाडी (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत संजय प्रल्हाद आलदर (रा. नाझरे, सरगरवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी बापू मदने (रा. झापाचीवाडी) व ज्ञानेश्वर सरगर (रा. सरगरवाडी, ता. सांगोला) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी संजय आलदर यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी आर्थिक अडचणीमुळे ३० हजार रुपये उसने घेतले होते. उसने पैशाच्या मोबदल्यात फिर्यादीने दूध बिलातून सुमारे २० हजार रुपयांची परतफेड केली होती तर उरलेले १० हजार रुपये देणे बाकी होते.

आरोपीची दूध डेअरी बंद पडल्यामुळे फिर्यादी त्यांच्याकडील दूध दुसऱ्या दूध संस्थेला घालू लागला. तसेच फिर्यादीच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी १० हजार रुपये परत केले नव्हते. दरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजता आरोपीने घरी येऊन शिवीगाळ करून रात्रीपर्यंत पैसे दे अशी धमकी देऊन निघून गेला होता. मात्र फिर्यादीकडून पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे दोघेजण रात्री ११ च्या सुमारास घरी येऊन घराबाहेर बोलवले त्यांनी पैशाची जुळणी झाली की नाही असे विचारले असता फिर्यादीने नाही म्हणताच दोघांनी त्यास हाताने मारहाण करायला सुरुवात केली व त्यांच्याकडील २५ हजार रुपये किमतीची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.