इस्लामपूर परिसराला अवकाळीने झोडपले 

इस्लामपूर परिसराला शनिवारी पहाटे अवकाळी पावसाने झोडपून काढले. तासभर पडलेल्या या पावसाने अनेक भागात पाणीच पाणी झाले. हा पाऊस रब्बी पिकांना पोषक असला तरी द्राक्ष पिकांसाठी मात्र नुकसानीचा ठरणार आहे. पावसामुळे ऊस तोडीवरही परिणाम होणार आहे. गेली आठ दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण होते. गेल्या दोन दिवसांपासून उष्णताही वाढली होती. शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात खोपटी घालून राहिलेल्या ऊसतोड मजुरांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसामुळे ऊस तोडणीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी तुटलेला ऊस फडातच पडून होता. आता शिवारातील पाणी हटेपर्यंत ऊस तोड थांबणार असल्याने ऊस हंगामातही अडथळे येणार आहेत.