आटपाडीत रस्त्यावरच भरतोय आठवडा बाजार, पर्यायी जागेची व्यवस्थाकरण्याची मागणी

आटपाडीचा आठवडा भाजीपाला बाजार हा अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिर परिसरातून येत असणाऱ्या  ओढापात्रात व उत्तरेश्वर मंदिराच्या लागत व पाठीमागील बाजूस भरत होता. या ओढापात्रात गेल्या काही महिन्यांपासून गदिमा नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे. परिणामी उत्तरेश्वर मंदिर लागत व पाठीमागील बाजार हा ओढापात्रातून जात असणाऱ्या रस्त्यावरच गेल्या काही महिन्यांपासून भरत आहे. शुक ओढ्याच्या पुलापासून सुरू होणारा हा बाजार राजारामभाऊ  हायस्कूलजवळील डॉ. पाटील यांच्या दवाखान्यापर्यंत पोहोचला आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूस ओढापात्र आहे. या ओढापात्रात कचरा साचलेला आहे. तर, काही ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी येत आहे, तर अशातच अनेक ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचरा, विक्रेत्यांनी टाकलेले वेस्टेज यातच शेतकरी व विक्रेत्यांना भाजीपाला घेऊन विक्री करावी लागत आहे. आटपाडीच्या मुख्य व्यापारी पेठेला बायपास म्हणून ओढापात्रातून रस्ता निर्माण केला आहे. दर शनिवारी आठवडा बाजार दिवशी येथे मोठी वाहतूककोंडी होते.

अरुंद असणाऱ्या रस्त्यावर व्यापारी, विक्रेत्यांच्या चारचाकी वाहने, राहुट्या व विक्रीचे सामान यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होते. आठवडा भाजीपाला बाजार रस्त्यावरच भरत असल्याने अनेकवेळा यामुळे वाहन चालक, नागरिक, विक्रेते यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडतात. याप्रश्नी तोडगा काढून आटपाडी नगरपंचायतचे प्रशासक तथा तहसीलदार सागर ढवळे व मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी यामध्ये सुधारणा करून पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त होत आहे.