एका आठवड्यात गुंडाळणार हिवाळी अधिवेशन; संभाव्य तारखा समोर

 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सध्या मुंबईत राज्याचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची, शोक प्रस्ताव आणि राज्यपालांचे अभिभाषण असे कामकाज पार पडले.

विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनानंतर आता लवकरच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाची संभाव्य तारीख समोर आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत आहे. यंदा नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे एक आठवडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार १२ डिसेंबरपासून सचिवालय नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर १५ डिसेंबरला संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होईल.