टेंभू पाणी योजनेची बारा गावांतील कामे सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा!

आटपाडी तालुक्यातील वंचित १२ गावांतील टेंभू योजनेची कामे ८ ऑगस्ट पूर्वी सुरू करा. बंद पाइपलाइनची कामे सुरू न केल्यास ९ ऑगस्ट रोजी वंचित गावातील शेतकऱ्यांच्यासमवेत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते आनंदराव पाटील यांनी दिला आहे. याबाबत प्रमुख श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बारा गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी बारा बैठका घेण्यात आल्या.

यामध्ये गुळेवाडी, विभूतवाडी, तरसवाडी, कुरुंदवाडी, चिंचाळे, वलवण, खरसुंडी, धावाडवाडी, आवटेवाडी, राजेवाडी, लिंगिवरे, पूजारवाडी, उंबरगाव, पिंपरी बु. आंबेवाडी, बोंबेवाडी या गावांत बैठका घेऊन आंदोलनाबाबत जनजागृती करण्यात आली.
श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याची माहिती आनंदराव पाटील यांनी दिली. यावेळी विजयसिंह पाटील, जनार्दन झिंबल, दत्तात्रय यमगर, नाना दाजी मोटे, चंद्रकांत पावणे, नाना मोटे, बाळासो खताळ, भीमाशंकर स्वामी, उपस्थित होते.