सध्याच्या या काळात गुन्हेगारी तर वाढलीच आहे अशातच आता खून, मारामारी, चोरीचे प्रमाण वाढले असताना फसवणुकीच्या घटना देखील घडतानाचे चित्र दिसत आहे. आर्थिक फसवणूक होत असताना आता बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले आणि परिसरात
कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय दाखला नसताना बनावट डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या जीवाशी त्यांनी अक्षरशः खेळ चालवला आहे.अशा बनावट डॉक्टरांची शासकीय यंत्रणेमार्फत रितसर चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. याबाबत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एकाकडे चौकशी केली असता, त्याने एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सर्टिफिकेटची मागणी केली असता त्याने नोंदणी क्रमांक एक्स्पायर झाल्याची माहिती दिली. शंका आणखी बळावल्यानंतर त्याने वैद्यकीय दाखला व ओळखपत्र दाखवले. मात्र त्यांचे फोटो घेण्यास मज्जाव केला.
संबंधित डॉक्टरचे वडील सेंट्रिंग कामगार आहेत. त्याने बारावीनंतर एका औद्योगिक वसाहतीत नोकरी केली आहे. त्यानंतर त्याने हेरले येथील एका हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात नोकरी केली. त्यानंतर हातकणंगले येथील एका हॉस्पिटलमध्ये आणि कोरोची येथील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी केली आहे. या बळावरच स्वतः एमबीबीएस डॉक्टर असल्याचा डंका त्याने परिसरात वाजविला आणि स्वतः प्रॅक्टिस सुरू केली. गेल्या काही महिन्यांत त्याच्यामुळे कित्येक रुग्णांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अल्पावधीतच त्याचे पितळ उघडे पडले आहे. असे आणखीनही बनावट डॉक्टर परिसरात वावरत आहेत.
हातकणंगलेसारख्या सुसंस्कृत शहरात जिथे सुशिक्षित लोक मोठ्या संख्येने राहतात, अशा ठिकाणी असा बनावट व्यवसाय करण्याची परवानगी कशी दिली, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेनेही त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. वरिष्ठ वैद्यकीय यंत्रणेमार्फत अशांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.