लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. उमेदवार, पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत.सट्टा बाजारातही लोकसभेचा विजयी उमेदवार कोण असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांवर कार्यकर्ते पैजा लावत असतानाच हजार रूपये पासून लाख रूपयेपर्यंत सट्टा लावण्यात येत आहे. त्यामुळे उलाढाल वाढली असून सटेट्बाजांना 4 जूनची ओढ लागली आहे.हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी पार पडलं. एकूण सात टप्प्याचे मतदान झाल्यानंतर देशातील संपूर्ण लोकसभेचा निकाल 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जनतेने कौल कोणाला दिला आहे? याबाबत उत्सुकता लागली आहे.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे खासदार धैर्यशील माने ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यात आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मत विभाजन फॅक्टरमुळे राजू शेट्टी यांना पराभवाचा फटका बसला होता. मात्र, त्यावेळी मुस्लिम चेहरा असल्याने दलित आणि मुस्लिम समाजाची मते वंचितच्या पारड्यात पडली होती. मात्र, यंदा वंचित किती मते घेणार? यावर बरेच गणिते अवलंबून आहेत