इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात वाढू लागली इच्छुक उमेदवारांची संख्या…..

इचलकरंजी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसे इचलकरंजीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाआघाडीमधून लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे आघाडीतील प्रमुख घटक असलेला राष्ट्रवादीचे शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इचलकरंजीतील इच्छुक मंडळी भेट घेण्यासाठी संपर्क करत आहेत. त्यामुळे शरद पवार कोणाला तुतारी वाजवायला लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी मुंबईत भेट घेतली. सुरेशदादा पाटील हे आपल्या राज्य कार्यकारणी सदस्यांसोबत शरद पवार यांना कोल्हापूर दौऱ्यावेळी पुन्हा भेटणार आहेत. या भेटीत ते महायुतीला सोडचिठ्ठी देणार का ? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला. समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होत आहे. त्यामुळे राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी शरद पवार व प्रदेश पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील राजकिय घडामोडीत शरद पवार हे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या भेटीत इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील उमेदवारी व मराठा आरक्षण या विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. सुरेशदादा पाटील यांनी महाविकास घेतल्यास महायुतीला तडा जाण्याबरोबर आघाडी सोबत जाण्याचा निर्णय मराठा संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यात निर्माण झालेले पक्ष कार्यकर्त्यांचे बळ महाविकास आघाडीला फायद्याचे तर महायुतीला नुकसानकारक ठरेल, असे बोलले जात आहे.