आटपाडी तालुक्यातील पडळकर गटाचे आगामी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायतकडे लक्ष

खानापूर विधानसभा निवडणुकीला ब्रम्हानंद पडळकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. गेल्या एक वर्षापासून त्यांनी खानापूर, आटपाडी व विसापूर गटात तयारी केली होती. गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेचे आमदार असताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली होती, तर ब्रह्मानंद पडळकर हे समाज कल्याण विभागाचे सभापती असताना त्यांनी खानापूर मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आटपाडीचे गोपीचंद पडळकर यांनी जतमधून निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. या विजयामुळे तालुक्यातील पडळकर गट रिचार्ज झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पडळकर गटात शेकडो कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू आहे. जतच्या यशाने कार्यकर्त्यांमध्ये फील गुड वातावरण पसरले आहे. माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. मोठ्या प्रमाणात विविध पक्षांतील नेतेमंडळी लवकरच भाजपच्या पडळकर गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी भिंगेवाडी येथील विष्णुपंत काळबाग, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माजी ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

राजकारणाचा श्रीगणेशा पडळकर बंधूंनी आटपाडी तालुक्यातूनच करत विधानपरिषद ते विधानसभा सदस्य असा प्रवास केला आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय पटावर आपली पक्कड मजबूत ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील प्रमुख मंडळींनी पडळकर गटात प्रवेश केला आहे, तर अनेक जण प्रतीक्षेत आहेत.

पुढील २०२९ च्या विधानसभेची तयारी आतापासूनच ब्रह्मानंद पडळकर यांनी सुरु केली आहे. त्यांची रंगीत तालीम म्हणूनच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यामध्ये पडळकर गटाला किती यश येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.