रस्त्यावर डोके आपटल्याने यड्रावच्या युवकाचा मृत्यू

यड्राव येथील भाग्येश कृष्णात धुमाळे (वय 17, रा. गावभाग) या महाविद्यालयीन युवकाचा गटारीत पाय अडकून पडून डोके आपटल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी इचलकरंजीत दुपारी 12 च्या सुमारास केईएम हॉस्पिटलसमोर घडली.युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

भाग्येश हा इचलकरंजी येथील एका महाविद्यालयात 12 वी कला शाखेत शिकत होता. सकाळी नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयास गेला होता. मधल्या सुट्टीत तो मित्रासोबत चहा व नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. याचवेळी याच महाविद्यालयातील शिक्षक येत असल्याचे पाहून भाग्येश व त्याच्या मित्राची पळापळ सुरू झाली. यावेळी पळताना भाग्येशचा पाय गटारीत अडकल्याने तो जोरात आपटला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

त्याच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शव विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. यावेळी नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईक व मित्रांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची वर्दी इंदिरा गांधी इस्पितळातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस नाईक कुरणे करीत आहेत.