इस्लामपूर शहरातील नियोजित विकासकामे निधीअभावी ठप्प….

इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी तत्कालीन राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने अंबाबाई उद्यान, कुसुमताई उद्यान आदी दोन उद्याने वगळता उर्वरित तीन उद्याने आजही ठेकेदारांच्या ताब्यात असल्याने पालिका नियोजनाअभावी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडलेल्या बागा बेचिराख झाल्या आहेत. यामध्ये पालिकेचे कोट्यवधी रुपये बुडीत झाले आहेत. याला जबाबदार कोण असाही सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

इस्लामपूर शहरातील झालेल्या आणि होणाऱ्या विविध विकासकामांचा श्रेयवाद विधानसभा निवडणुकी अगोदर पेटला होता. आमदार जयंत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. यातून झालेल्या विकासकामांवरील कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेले. सध्या नियोजित विकासकामांकरिता पालिकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामे ठप्प होण्याची शक्यता आहे.

आमदार जयंत पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून शहरातील चौफेर विकास करण्याचा मनोदय वेळोवेळी बोलून दाखवला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास  करण्याचा मनसुबा त्यांच्याच समर्थकांनी उधळून लावला आहे. यामध्ये केलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, घरकुले आणि बगिचे अशा आदी विकासाचा समावेश आहे. त्यानंतर विरोधी विकास आघाडीने ५ वर्षे सत्ता काबीज केली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण आणि नियोजित भुयारी गटारींचा प्रारंभ केला. परंतु, आता भुयारी गटारींचे काम ठप्प आहे.

त्यामुळे रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या कल्पनेतून शहराचा चौफेर विकास करण्याचा मनोदय सध्यातरी बारगळला आहे. यामध्ये क्रीडांगणे, बगिचे, विमानतळ, २४ बाय ७ पाणी योजना, प्रशस्त रस्ते अशा आदी योजना मंजूर करण्याचा त्यांचा डाव सरकार बदलामुळे आता पाठीमागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नियोजित विकासकामे निधीअभावी ठप्प होणार आहे.