हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे न्यु इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज व शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. विज्ञानाची गोडी लागावी नवनिर्मितीसाठी संशोधनासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना चालना मिळावी याकरिता विज्ञान प्रदर्शन मोलाची भूमिका बजावतात यातून संशोधन संवर्धन व नाविन्याचा शोध घेऊन नवीन उपकरणे तयार केली जातात याचा हेतू एवढाच की मानवाचे जीवन समृद्ध करण्यासाठी विद्यार्थ्याच्या मनात संशोधक वृत्ती जागी व्हायला पाहिजे, असे मत आमदार डॉ. अशोकराव माने यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार डॉ. राहूल आवाडे,आमदार जयंत आसगावकर, सरपंच सौ. सुप्रिया पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्याचा सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहूल आवाडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार आसगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. तर डॉ.श्रीराम साळूंखे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील १९४ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी केवळ संशोधन व उपकरणे निर्मिती न करता नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणाऱ्या प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी बहुतांश संशोधनाचा कल दिसून आला. यामध्ये प्रदुषण नियंत्रण, बीज बचतीसाठी सोलर वापर, अपघात रोखण्यासाठी हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालू होणार नाही व ओव्हरटेक करताना दक्षता म्हणून स्क्रिन सेन्सॉर यासारख्या उपकरणांमध्ये सामाजिक भान जपल्याचे दिसून आले.
ओला कचरा, सुका कचरा विकेंद्रीकरण, टाकाऊ प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू हवा शुध्दीकरण मशीन यांसह बहुतांश उपकरणांचा शोध नागरी जीवन सुधारण्यासाठी व समृद्ध जीवनासाठी असल्याने नागरिकांमधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.