हुपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून परवा दोन मोटारसायकली लंपास केल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. तोपर्यंत वाळवेकर नगरमध्ये धाडसी घरफोडी करुन ५० हजार रुपयांहून अधिक सोन्याचे दागिन्यावर डल्ला मारत चोरट्यांनी हुपरी पोलिसांनाच आव्हान केले आहे यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली असून पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये मोटरसायकल चोरी घरफोडीचे सत्र थांबायला तयार नाही याच भागात काही दिवसांपूर्वी रोख रकमेसह लाखो रुपयांचे दागिने लांबविले होते.
मात्र कामगारांच्या हातून हा गंभीर प्रकार घडल्याने तपासाला विलंब लागला नाही ताब्यात घेताच आरोपी प्रमोद वडर व किरण जाधव यांनी गुन्हा कबूल करून तपासाअंती मुद्देमाल हस्तगत केला होता. यामध्ये फार मोठी धावपळ पोलिसांना करावी लागली नाही हे विशेष आहे. काल पुन्हा मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत तिजोरीतील साहित्य विस्कटून टाकत रोख रक्कम ३५ हजार व सोन्याचे मणी व रिंग असे ५ ग्रॅम दागिने किंमत १५ हजार असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.