अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली आहे. विनापरवाना बेकायदेशीरपणे, पात्रता नसताना वैद्यकिय व्यवसाय करून रुग्णांच्या जिवीतास व आरोग्यास धोका होईल, याची जाणीव असतानाही लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर (दंडाची वाडी) येथील बोगस डॉक्टर विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनांक ११ डिसेंबर रोजी डॉ. अविनाश उत्तम खांडेकर सध्या नेम. पंचायत समिती सांगोला तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगोला पोलीसात प्रविण विरुपक्षपा बडगीरे रा. लक्ष्मीनगर (दंडाचीवाडी) ता. सांगोला याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
११ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सांगोला तालुका अधिकारी यांनी मौजे लक्ष्मीनगर (दंडाचीवाडी) येथे भेट दिली असता, येथे चार ते पाच वर्षापासून प्रविण बडगीरे हा येथील मारुती मंदीराजवळ स्वःताच्या घरामध्ये खाजगी वैद्यकिय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे वैदयकिय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी कोणत्याही नोंदणी व शैक्षणिक पात्रता नसल्याचे आढळून आल्याने, सदर प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.