हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याकडील ऊसतोड़ मजुरांच्या साखर शाळेतील मुलांना जवाहर साखर कामगार संघटना यांचे वतीने शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी श्री. बिरणगे यांनी, कारखाना व संघटना यांच्या साखर शाळेतील मुलांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवले जातात त्या मुलांना कारखान्याने शाळेपर्यंत ने-आण करणेसाठी केलेली व्यवस्था व देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा याबाबत समाधान व्यक्त केले. अवनी संस्थेचे श्री. माहिते यांनी ही सर्व मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आमची संस्थाही काम करते.
तसेच त्याकरिता जवाहर साखर कारखान्यासारख्या संस्थांची आम्हास चांगली मदत मिळते, असे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक कामगार संघटनचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले. साखर शाळेसाठीचे जवाहरचे समन्वयक आण्णासो गिरीबुवा व उमेश कांबळे यांनी कारखान्याकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, एच. आर. मॅनेजर अनिल वलशेट्टी, जिल्हा परिषदेचे श्री. साळोखे, श्री. सदलगे उपस्थित होते. आभार सुरेश पोवार यांनी मानले.