स्ट्रीट लाईटची दुरूस्ती न करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करा अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची समस्या तर आहेच. त्याचबरोबर नागरिकांना आणखी काही छोट्या मोठ्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. तक्रार करून देखील या समस्या दूर होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी देखील व्यक्त होत राहते. इचलकरंजी शहरातील स्ट्रीट लाईट बाबत वारंवार तक्रारी करुनही निरसन होत नसल्याने संबंधीत मक्तेदारावर कारवाई करावी अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना एका निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुमारे सतरा हजार स्ट्रीट लाईट आहेत. शहरातील स्ट्रीट लाईट, हायमास्टची देखभाल दुरुस्ती इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत मक्तेदाराकडून करण्यात येत असते.

सदर मक्तेदाराकडून फक्त दोनच कर्मचारी कार्यरत आहे. असे दिसून आले आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे स्ट्रीट लाईट तक्रारी बाबत सुमारे महिनाभर दिरंगाई होत आहे. या बंद स्ट्रीट लाईटचा फायदा घेवून शहरामध्ये अनुचित प्रकार घडत आहेत. व घडण्याची शक्यता नाकरता येत नाही. तथापि सदर संबंधित मक्तेदारची आपल्या स्तरावर कामाची तपासणी होवून संबंधितावर कारवाई होवून त्याचे कामनिहाय देयके अदा व्हावीत.

तसेच संबंधित मक्तेदाराकडून महानगरपालिकेचा गाळा गेली कित्येक वर्षापासून बेकायदेशीरपणे गोडावून म्हणून वापरत आहे. सदरचा गाळा कोणाचे आदेशाने वापरत आहे. आणि आदेश नसेल तर संबंधितावर योग्य ती कार्यवाही करुन त्याचे संपूर्ण भाडे वसूल करणेत यावे अशी मागणी करण्यात आली आहे.