लागली आगनऊ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी मागणी करूनसुद्धा विद्युत तारांची ओढ काढली नसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आष्ट्यातील शेतकऱ्यांचा अकरा एकर ऊस जळून खाक झाला.
उसाबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या पाईप व संच जळून खाक झाले आहेत.यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वे नंबर १५३/५ मधील व त्याच्या बाजूच्या क्षेत्रातील संभाजी सूर्यवंशी, भगवान पवार, वैभव पवार, दिनकर पवार, इलाई सनदे, अक्षय बुधगावकर या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे.
नुकसान भरपाई मिळावी म्हणून संभाजी सूर्यवंशी व शेतकऱ्यांनी राज्य विद्युत महामंडळ कार्यालयाकडे अर्ज केला आहे.संभाजी सूर्यवंशी यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, राज्य विद्युत महामंडळाकडे १० फेब्रुवारी २०१५ रोजी आम्ही लेखी अर्ज देऊन १५३ / ५ मधून गेलेल्या विद्युतदारांची ओढ काढून घेण्याबाबत सूचना केली होती. भविष्यात या विद्युत तारांच्यामुळे काही जीवित व वित्त हानी झाल्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल.
असेही त्या अर्जात त्यावेळी नमूद केले होती. पण, २०१५ नंतरही वारंवार तोंडी सूचना देऊनही, राज्य विद्युत महामंडळाने कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास आमच्या सदर क्षेत्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तरी राज्य विद्युत महामंडळाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई तत्काळ द्यावी व भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. उसाला आग लागल्यानंतर नगरपालिकेची अग्निशामक गाडी आली पण फार वेळ झाला होता.