इचलकरंजीत लाचप्रकरणी वकिलाला न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

लाचप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या एका बँकेच्या कायदा सल्लागाराची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ॲड. विजय तुकाराम पाटणकर (वय ३८, रा. इचलकरंजी) याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पाटणकर यांच्या वकिलाकडून न्यायालयासमोर त्याचा जामीन अर्ज सादर केला आहे. आता याप्रकरणी न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एका बँकेचे कायदेशीर सल्लागार ॲड. विजय पाटणकर याला सीबीआयच्या लाललुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. दरम्यान, सीबीआयने पाटणकर याच्या कार्यालयाची झाडाझडती घेऊन तपासणी केली. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केले आहेत. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

आज पोलिस कोठडी संपल्यानंतर पाटणकर याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाटणकर याला न्यायालयीन कोठडी सुनावली.पाटणकर यांच्याकडून वकिलामार्फत जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. तत्पूर्वी सीबीआय आणि सरकारी वकिलांचे म्हणणे न्यायालय ऐकून घेणार आहे. त्यानंतर न्यायालयाकडून सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होईल.

जिल्ह्यात प्रथमच कारवाई झालेल्या याप्रकरणी तपासात काही महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रांमुळे तपासाला नवी दिशा मिळून मोठी उकल होण्याची शक्यता आहे. तसेच याप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींच्या हालचाली, आर्थिक देवाणघेवाणी तसेच इतर पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे. केवळ जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी कायदा सल्लागाराने इतकी मोठी लाच स्वीकारल्याने या तपासातून आणखी कोणत्या धक्कादायक बाबी उघडकीस येतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.