क्लिअरिंगच्या विलंबामुळे ग्राहकांना आर्थिक फटका

इचलकरंजी,   संपूर्ण भारतामध्ये ऑक्टोबरपासून दोन टप्प्यात समाशोधन (क्लिअरिंग) ज्या-त्या दिवशी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ज्या त्या दिवशी होण्याऐवजी दोन तीन दिवसाचा अवधी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येत्या दोन दिवसात तांत्रिक अडचण दूर होऊन क्लिअरिंग ज्या – त्या दिवशी जमा होईल असे शहरातील काही बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 ज्या-त्या दिवशी क्लिअरिंग जमा व्हावे यासाठी रिझर्व्ह बँक इंडिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रमुखाकडे विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन आदींनी केली होती. सततच्या पाठपुरवठ्यामुळे पहिल्या टप्प्यात ४ ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे. त्यात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चेक स्विकारले जातील. बँकाना मिळालेले चेक लगेच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवावे लागतील. आणि दुसऱ्या बँकेने सांयकाळी सात वाजेपर्यंत चेक मंजूर किंवा नामंजूर असलेचे कळवावे लागेल. जर बँकेने वेळेतउत्तर दिले नाहीतर चेक आपोआप मंजूर मानला जाईल. बँकाना चेक मिळाल्यानंतर जास्ती जास्त तीन तासाच्या आत मंजूरी द्यावी लागणार आहे. वेळेत मंजूर न दिल्यास चेक सेटलमेंट झाल्यावर बँकेने ग्राहकाला लगेच किंवा तासाभरानंतर दयावे लागतील. अशी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, क्लिअरिंग वेळेत होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकाकडून वाढत आहेत. त्याचा नाहक आर्थिक फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे.

याबाबत काही बँकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता तांत्रिक अडचणीमुळे क्लिअरिंग होत नसल्याचे संगितले. येत्या दोन दिवसात सदरची प्रक्रिया सुरळीत होईल असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.