अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे खून, मारामारी, फसवणूक असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. मिळकतीवर बेकायदेशीरपणे कर्जाचा बोजा टाकून बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करून 12 कोटी 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मारुती दत्तोबा निमणकर, प्रकाश मारुती निमणकर, राजेश मारुती निमणकर, ऋषीकेश राजेश निमणकर, अभिषेक राजेश निमणकर (सर्व रा. राजाराम रोड इचलकरंजी), अॅड. एस. एन. मुदगल, दत्तात्रय पी. म्हातुगडे (रा. कागवाडे मळा), तामिळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी. गणेशकुमार (रा. शिवकाशी ब-ँच विरुद्धानगर), विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम (सध्या रा. जुना चंदूर रोड, मूळ रा. मदुराई) अशी संशयितांची नावे आहेत.
फिर्याद अॅड. दिगंबर शंकरराव निमणकर (वय 75) यांनी दिली. याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली. इचलकरंजीतील अॅड. निमणकर यांच्या मालकीची सिटी सर्व्हे क्र. 15864/4, 15866 व सिटी सर्व्हे क्र. 15866/1 ते 9 अशी मिळकत आहे. संशयित मारुती निमणकर हे त्यांचे चुलत भाऊ आहेत तर प्रकाश निमणकर व राजेश निमणकर ही चुलत भावाची मुले आहेत. ऋषीकेश व अभिषेक निमणकर हे नातू आहेत.
फिर्यादी यांच्या मिळकतीचे टी. पी. स्किम 1, फायनल फ्लॉट नं. 255 मधील पान क्र. 3 वर उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशानुसार अंतरिम स्थगिती दिली आहे. तरीही 2022 ते 2024 या कालावधीत मारुती निमणकर, मंगल टेक्स्टाईल व प्रकाश विव्हिंग मिल्सचे प्रकाश निमणकर, मे. मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईलचे राजेश निमणकर, ऋषीकेश टेक्स्टाईलचे ऋषीकेश निमणकर, अभिषेक टेक्स्टाईलचे अभिषेक निमणकर आदी संशयितांनी अॅड. एस. एन. मुदगल, तामिळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी. गणेशकुमार, विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम यांना हाताशी धरले व संगनमताने 12 कोटी 18 लाख रुपयांचा कर्ज बोजा करून खोटे दस्त व बनावट कागदपत्र तयार करून घेतले.